डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न ( – Department of Information Technology
  • June 16, 2024
  • Skip to Main Content
  • Screen Reader Access
  • Font Resize:    A-   A  A+

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न (

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

विद्यापीठांनी पदव्युत्तर विभाग, संशोधन संस्था बळकट कराव्या: राज्यपाल रमेश बैस

‘बाटू’ विद्यापीठात कान्होजी आंग्रे अध्यासन सुरु करणार असल्याची उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा

अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधनासाठी विदेशात जातात. यापैकी अनेकजण विदेशात स्थायी होण्याचा प्रयत्न करतात. आयआयटीतील अनेक विद्यार्थी विदेशात स्थायिक होतात. बुद्धिवंतांचे हे स्थलांतर थांबविण्यासाठी विद्यापीठांमधील पदव्युत्तर विभाग व संशोधन संस्था बळकट करण्याची गरज आहे. या दृष्टीने उद्योग व विद्यापीठ सहकार्य वाढले पाहिजे व माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटू) पंचविसावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत सोमवारी (दि. १९) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षांत समारोहाला राज्याचे उच्च व तंत्रश‍िक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कारभारी काळे, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.

जगात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. अनेक देशांमधील लोकसंख्येचे सरासरी वयोमान वाढत असल्यामुळे या देशांमध्ये युवा कुशल मनुष्यबळाची गरज भासत आहे. एकट्या जर्मनीला वर्षाकाठी चार लाख कुशल मनुष्यबळ हवे आहे. या दृष्टीने जगात कोणत्या कौशल्याची मागणी आहे हे पाहून त्यानुसार कौशल्य अभ्यासक्रम आखावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी केवळ नोकरी करणारे युवक नको, तर उद्योजक, स्टार्टअप उद्गाते व नवोन्मेषक हवे आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

गेल्या शतकात वेगवेगळ्या देशांच्या औद्योगिक उत्पादनांचा बोलबाला होता. पूर्वी जर्मनीच्या उत्पादनांना मागणी होती, कालांतराने ‘मेड इन जपान’ व अलीकडे ‘मेड इन चायना’ उत्पादनांची बाजारात उपलब्धता होती, असे नमूद करून एकविसावे शतक भारतात तयार झालेल्या उत्पादनांचे असेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

विद्यापीठात कान्होजी आंग्रे अध्यासन सुरु करणार: उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये ‘शिवसृष्टी’ उभारणार आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरु केले जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. सदर अध्यासनाच्या माध्यमातून सागरी विज्ञान, युद्धकला आदी विषयांचे अध्ययन केले जाईल असे त्यांनी सांगितले.
मा. राज्यपाल महोदयांनी या पदवीदान समारंभाचे वैशिष्ट विषद करताना नॅशनल अकडेमिक डीपोजिटरी पोर्टल सुरू केले याचे कौतुक केले. यामुळे विद्यार्थ्यांना लगेचच ऑन लाईन डिग्री मिळाली आहे. पदवीदान झाल्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉकर मध्ये पदवी मिळाली. हे असे करणारे हे देशातील पाहिले विद्यापीठ आहे.

आज जगातील अनेक कंपन्यांचे मुख्याधिकारी भारतीय वंशाचे लोक आहेत. परंतु अनेक उत्पादनांचे पेटंट दुसऱ्या देशांकडे असल्यामुळे देशाचा मोठा पैसा रॉयल्टीच्या रूपाने विदेशात जातो. विद्यापीठाने नावीन्यतेच्या माध्यमातून पेटंट प्राप्त केल्यास विदेशातून रॉयल्टी प्राप्त होऊन देश श्रीमंत होईल असे पाटील यांनी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ‘बाटू’च्या उपकेंद्रांसाठी जागा देण्याबाबत आदेश काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आपले योगदान असल्याचे नमूद करून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आपण जिल्हा नियोजन निधीतून दिड कोटी रुपये विद्यापीठाला देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले. कोकणातले तंत्रशास्त्र विद्यापीठ देशात पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठाशी २७३ महाविद्यालये व संस्था संलग्न असून एकूण एक लाख अडतीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे कुलगुरु डॉ कारभारी काळे यांनी आपल्या अहवालात सांगितले. विद्यापीठाने संशोधन केंद्रे स्थापन केल्याचे सांगून विद्यापीठाचा ‘सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’सोबत शैक्षणिक करार झाल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारोहात २२२६७ स्नातकांना अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुशास्त्र, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन आदी विषयांमधील पदवी, पदव्युत्तर पदव्या व पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये १३ उमेदवारांना पीएच.डी. पदव्या प्रदान करण्यात आली.

Resize text-+=